कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड 19’ व, ‘पंतप्रधान सहायत्ता निधी’साठी रु 1 कोटी 2 लाखांचा निधी देण्यात आला. मुख्यमंत्री सहायता निधीचा रु.51 लाखांचा धनादेश औरंगाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.उदय चौधरी तर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तर ‘पीएम केयर्स फंड’ साठी देण्यात आलेला रू. 51 लाखांच्या निधीचे पत्र विभागीय आयुक्त श्री.सुनील केंद्रेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कोरोना विरूध्दची लढाई जिंकण्यासाठी शासनाबरोबरच सर्वांनी एकजूट दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे याच भावनेतून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सामाजिक जाणिवेतून एक कोटी रूपयांचा निधी जमा केला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ मराठवाड्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दातृत्वाने तसेच आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म.शि.प्र.मंडळ अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. ज्ञान दानाबरोबरच सामाजिक भान देखील जपण्याचे काम मंडळ करीत आले आहे. ज्या ज्या वेळेस देशावर आणि राज्यावर अशा प्रकारची आपत्ती आली त्या त्या वेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत या संकटांचा सामना करण्यासाठी आपली जबाबदारी उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूकंप, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये म.शि.प्र.मंडळाने अनेक वेळा स्वयंस्फूर्तीने मदत केली आहे.