शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात 11 ऑगस्ट 2020 रोजी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांच्या दालनात शिक्षक व पदवीधर आमदारांची बैठक झाली. या बैठकीस उपस्थित राहून कोरोनाच्या संकट काळात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावून राज्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मी या बैठकीत केली. शालेय शिक्षण विभागाने अनुदानासाठी घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर केले असले तरी सदरील निधी वितरणासाठी अद्यापही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा शासन निर्णय त्वरित निर्गमित करावा, प्रचलित धोरणांप्रमाणे शाळांना अनुदान मिळावे, शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या अघोषित शाळांना अनुदानासह घोषित करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांच्या सेवाशर्तीच्या संदर्भात प्रकाशित केलेली अधिसूचना त्वरित रद्द करावी अशा विविध मागण्या मी या बैठकीत केल्या. यावेळी शिक्षकांच्या अनुदानाच्या मागणीसाठी औरंगाबाद ते मुंबई अशी अन्नत्याग करून पायी दिंडी काढणारे शिक्षक श्री.गजानन खैरे यांना शालेय शिक्षण मंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते साखर पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडले.