वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात दि.7 मे 2017 रोजी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ‘नीट’ (NEET) परीक्षा घेण्यात आली. मराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी औरंगाबादशहरात आले होते. मोठ्यासंख्येने शहरात नव्यानेच येणार्‍या परीक्षार्थी व पालकांची यामुळे तारांबळ उडणार होती. म्हणून या परीक्षेसाठी मी एक दिवस अगोदरच मुक्कामी आलेल्या गरजू विद्यार्थी व पालकांची राहण्याची, भोजनाची व परीक्षाकेंद्रांपर्यंत पोहचविण्याची व परत आणण्याची मोफत व्यवस्था केली. ‘नीट’ परीक्षेचे महत्व लक्षात घेता तसेच ऐनवेळी परीक्षाकेंद्र सापडण्यास अडचण नको म्हणून अनेक पालक आपल्या पाल्यासह एकदिवस आधीच औरंगाबाद शहरात आले होते. मात्र आर्थिक परिस्थितीअभावी सर्वांनाच हॉटेल/लॉजवर राहणे परवडत नाही. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थी रेल्वेस्टेशन, बस स्टँडवरच झोपतात. त्यामुळे अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी मी राहण्याची, भोजनाची व्यवस्था देवगिरी महाविद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहात केली. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचविण्याची तसेच परत आणण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह बुलढाणा, जळगाव, धुळे, अहमदनगर आदी जिल्ह्यातील जवळपास 600 विद्यार्थी व 400 विद्यार्थींनींनी या सुविधेचा लाभ घेतला.