माझे वडील श्री. सखाराम शिंदे हे वनश्री पुरस्काराने सन्मानित आहेत. माझे वडिल डाळिंबाची शेती करायचे. मात्र तेल्या रोग आल्यामुळे डाळिंबाची शेती बुडाली व माझे कुटुंब कर्जबाजारी झाले. त्यानंतर मोसंबीची बाग लावली, नर्सरी केली. मात्र 2012 मध्ये दुष्काळ पडला व रोपांची विक्री घटल्याने आम्ही आर्थिक संकटात सापडलो. तेंव्हा मी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, कात्रज, पुणे येथे सराव करत होतो. पण आर्थिक अडचणीमुळे घरी परत यावे लागले. माझी ही परिस्थिती आदरणीय सतीशभाऊ चव्हाण यांना कळाल्यानंतर त्यांनी मला एक वर्ष दत्तक घेतले व सर्व खर्च केला. माझ्या कुस्तीचा सतीशभाऊंमुळे पुनर्जन्म झाला. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. आदरणीय भाऊंच्या या अनमोल प्रेरणेने नंतर मी गोंदिया येथे झालेल्या ’महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत 96 किलो वजन गटात रौप्यपदक मिळवले. पुढे 2014 मध्ये नगर येथील ’महाराष्ट्र केसरी’ गटात कांस्यपदक पटकावले तर 2016 मध्ये ग्रीकोरोमन या स्पर्धेत ओपन गटात सुवर्णपदक मिळवले. 2017 मध्ये भूगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्यपदक मिळवून मी उपमहाराष्ट्र केसरी ठरलो. मात्र 2018 मध्ये जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माझ्या गुडघ्याला दुखापत झाली व लिगामेंट तुटली. त्यामुळे गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागले. त्या ऑपरेशन व फिजिओथेरपीसाठी सतीशभाऊ चव्हाण यांनी तीन लाख रुपये खर्च दिला आणि पुन्हा एकदा एका मोठ्या संकटातून भाऊंमुळे मी बाहेर पडलो. भाऊंनी जर या दोन्ही वेळा मदत केली नसती, तर मला यातील काहीच शक्य झाले नसते. माझे कुस्ती करिअर खरे म्हणजे 2012 मध्येच संपुष्टात आले होते. मी आज जे काही आहे ते सर्व आदरणीय आ. सतीशभाऊ चव्हाण यांच्यामुळेच आहे.

पैलवान अक्षय सखाराम शिंदे

(उपमहाराष्ट्र केसरी) मु.पो.शिवनी,ता.जि.बीड