मराठा तरुणांनो आत्महत्येने प्रश्न सुटणार नाहीत..!

मराठा तरुणांनो आत्महत्येने प्रश्न सुटणार नाहीत..!

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आता निर्णायक स्थितीत येवून पोहोचले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई अंतीम टप्प्यावर आली आहे. सरकारने काल जाहीर केले की नोव्हेंबर पर्यंत आरक्षणासंबधी वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल व तो पर्यंत मेगा नोकरभरती प्रक्रिया होणार नाही.
या पार्श्वभूमीवर आपण आता विचार करुन शांतता, संयम आणि सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. ५८ मोर्चे आपण शांततेत, मूकपणे, अहिंसेच्या तत्वाने काढून जगात आदर्श निर्माण केला होता. तो आदर्श आपणांस कायम टिकवायचा आहे. कोवळ्या वयातील माझे ‘तरुण’ या लढाईत समाजासाठी हौतात्म्य पत्कारीत आहेत. ही बाब मनाला अतिशय व्यथित करणारी आहे. उच्चशिक्षित, पदवीधर, शिक्षण चालू असणाऱ्या या तरुणांचे असे अकाली जाणे राज्य व समाजाच्या स्वास्थ्यासाठी चांगले नाही. त्याबरोबर या कृतीमुळे आपले कुटुंब उघड्यावर येते. मित्रहो आत्महत्येने कुटुंबाचे प्रश्न सुटत नाही उलट वाढतात. किमान आपल्या कुटुंबाचा विचार करा. आईवडिलांच्या स्वप्नांचा विचार करा. त्यांना हे दुःख पचवणे अवघड जाते. त्यांचा आपण भविष्याचा आधार असता. आपल्या मागे आपल्या जाण्याने परिवाराला प्रचंड यातना होतात त्याचा विचार करा. मुळात आपला ‘लढाईचा’ इतिहास आहे. छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी राजेंचा वारसा आपण गौरवाने सांगतो. तोच प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याचा आपला इतिहास आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना संघर्ष शिकवावा लागत नाही. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत सनदशीर मार्गाने आपण संघर्ष करीतच राहू, परंतु आपण कोणीही या प्रश्नी भावनिक होवून टोकाचे पाऊल उचलू नका असे कळकळीचे आवाहन आपणांस करतो.
बांधवांनो आता भावनिक होवून चालणार नाही तर ही लढाई लोकशाही, शांततेच्या मार्गाने चालू आहे तशीच आरक्षण मिळेपर्यंत चालू ठेवू व समाजाच्या न्यायहक्कासाठी सामुहिक प्रयत्न करुयात परंतु आत्महत्या, हिंसाचार, जाळपोळ असे पर्याय निवडू नका हेच नम्र आवाहन..!!

Leave a comment