स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण धावपळ करताना दिसतो. लोकांना आपल्या प्रकृतीकडेही लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांना आज सामोरे जावे लागत आहे. या रोगांवर उपचार करण्यासाठी लागणारा लाखो रूपयांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य समस्येमुळे होणारी परवड टाळता यावी म्हणून मी माझे वडील कै.भानुदासराव चव्हाण यांच्या नावाने भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना करून या माध्यमातून मराठवाड्यातील गोर-गरीब गरजू रूग्णांना शासनाच्या विविध योजना व खाजगी, दानशूर संस्थांच्या मदतीने अनेक वर्षांपासून मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहे. आतापर्यंत मराठवाड्यासह राज्यभरातील असंख्य रूग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तसेच भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने विविध सामजिक उपक्रम राबविले जातात. मराठवाड्यातील अपंगांसाठी कृत्रिम पाय, कॅलिफर्स, कुबड्या आणि सायकलचे मोफत वाटपांचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम औरंगाबाद जिल्ह्यात 26 ते 29 जानेवारी 2016 या दरम्यान घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील जवळपास 400 अपंगांना विविध साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. ज्यामध्ये अनेक अपंग निराधारांना कृत्रिम पाय, सायकल वाटप करण्यात आल्या. तर हाच उपक्रम जालना जिल्ह्यात 1 मार्च ते 5 मार्च 2016 यादरम्यान घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील जवळपास 900 रूग्णांनी नोंदणी केली होती. अपंगांना विविध साहित्यांचे यावेळी मोफत वाटप करण्यात आले.