समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा संपली की लगेच वसतिगृह सोडावे लागते. मात्र इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी सीईटी, नीट, जेईई या प्रवेश परीक्षा देत असतील तर संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा देईपर्यंत वसतिगृहात राहू द्यावे मात्र त्या विद्यार्थ्यांना भोजनाची सुविधा देण्यात येऊ नये असे पत्रकच राज्याच्या समाज कल्याण आयुक्तालयाने मार्च 2018 मध्ये काढले होते. हे पत्रक त्वरित मागे घेऊन वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी मी 26 मार्च 2018 रोजी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याव्दारे केली होती. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील व गरीब घरातील असून त्यांची शहरात राहण्याची कुठलीही सोय नाही. त्यांच्या खिशात पैसे नाहीत, त्यामुळे या नवीन फर्मानामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा सोडून जेवणासाठी रस्त्यावर फिरायचे का? असा प्रश्न सभागृहात उपस्थित करून वसतिगृहात राहणार्या गरीब विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांची भोजनाची देखील व्यवस्था करावी अशी मागणी मी केली होती. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्र्यांनी यासंदर्भात निर्णय घेऊन 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना 12 वीची परीक्षा संपल्यानंतर एमएच-सीईटी, नीट, जेईई या परीक्षापर्यंतच्या अभ्यासासाठी शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची निवासासह भोजनाची नियमीत व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा संपूर्ण राज्यभरातील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना झाला.