राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा तसेच खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवे दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी व्हावा, यासाठी राज्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.3 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना राज्य सरकारने शासकीय सेवेत थेट नोकरी द्यावी अशी मागणी मी वेळोवळी शासनाकडे करीत आलो आहे. पदवीधर मतदारसंघातून सलग दुसर्‍यांदा निवडून आल्यानंतर सर्वात पहिली मागणी मी हीच केली होती. यासंदर्भात 4 जुलै 2014 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हा प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंतीही केली होती. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना औरंगाबाद महानगरपालिकेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट नोकरी द्यावी अशी मागणी देखील मी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली. यासंदर्भात महानगरपालिकेने ठराव देखील मंजूर केला. क्रीडा धोरणात सुधारणा होणार असल्याने पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या शासकीय सेवेत संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.