सन 2008 पासून मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतोय. मराठवाड्यातील पदवीधर बंधू-भगिनींनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती मी यशस्वीपणे पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलोय. मागील 12 वर्षांपासून आमदार असलो तरी माझा आतापर्यंतचा प्रवास, कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवणे मला गरजेचे वाटते…

माझे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या सरस्वती भुवन शाळेत तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथून 1982 साली मी बी.ई.मॅकेनिकल ही पदवी संपादन केली. त्यानंतर सहा वर्ष विविध कंपन्यात नोकरी केली. मात्र तेथे मन न रमल्याने एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झालो. याठिकाणी एक वर्ष काम केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करायचे ठरवले. तसे पाहिले तर मी कधी आमदार होईल याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता. माझे वडील कै.भानुदासराव चव्हाण हे औरंगाबादच्या राजकारणात अनेक वर्षे सक्रीय कार्यरत होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व तत्कालीन प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष कै.विनायकरावजी पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. पुढे औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीची विविध पदेही वडिलांनी भूषविली. त्यामुळे घरात सतत राजकारणाची चर्चा चालत असे. असे असतानासुध्दा बारावीपर्यंत मी राजकारणापासून दूर होतो. मात्र 12 वीत असताना कै.वसंतरावजी काळे यांच्याशी संपर्क आला आणि मी चळवळीत आपोआप ओढला गेलो. विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडविण्यात सहभागी होऊ लागलो. या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी जाणीवपूर्वक काम केले. विविध आंदोलने केली. मी इंजिनीअरींगला शिकत असताना माझ्या कामाला अधिक गती आली. मी विद्यार्थी संसदेवर निवडून आलो. विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीदशेतील सर्व प्रवास तसाच पुढे चालू राहिला.   

विद्यार्थीदशेत कै.वसंतराव काळे यांच्याशी जो संबंध आला, तो अधिक दृढ होत गेला. पुढे त्यांच्याशी मैत्रीचे नाते बनले. मी त्यांचा विश्वासू सहकारी बनलो. 1984 पासूनच्या पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक निवडणूकीत नावनोंदणीपासून ते मतदानापर्यंतच्या सर्व प्रक्रियेत मी सहभागी होतो. केवळ सहभागीच नव्हतो तर व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावत होतो. माझी काम करण्याची पध्दत, जनसंपर्क पाहून वसंतरावांनीच 2000 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट व व्यवस्थापन समितीमध्ये काम करण्याची संधी दिली. या संधीचा फायदा उठवत मी विद्यापीठात माझ्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यात महत्वाची भूमिका बजावली. डॉ.सुधीर गव्हाणे यांच्या मदतीने कमवा आणि शिका योजनेला नवे रूप दिले. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्याचा फायदा ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झाला. या योजनेची त्यावेळी खूप चर्चा झाली. याशिवाय विविध धोरणात्मक निर्णय माझ्या काळात झाले. विद्यापीठाची ही कारकीर्द माझ्यासाठी खूपच उपयुक्त ठरली. त्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 2008 साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत मागील 12 वर्षांपासून म्हणजे सलग दोन ‘टर्म’ मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतोय.

आज मी राजकारणात असल्यामुळे व्यवसायकडे वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे व्यवसाय माझा भाऊ प्रदीप बघतोय. तर लहान भाऊ दिलीप शेती व्यवसाय सांभाळतो. माझी पत्नी आशा ही गृहीणी असून ती कौटुंबिक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडते. कन्या सुप्रिया व चिरंजीव अक्षय आज दोघेही स्वत:च्या पायावर उभे राहून आपापला व्यवसाय सांभाळताय. आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचे नेहमीच मिळत जाणारे पाठबळ व मतदारसंघातील मतदारांच्या शुभेच्छा व आशीर्वादाच्या जोरावर आजपर्यंतची ही वाटचाल सुरू आहे…
धन्यवाद…


आपला
सतीश चव्हाण