आदरणीय शरद पवार साहेबांसोबत 9 ते 15 जुलै 2016 मध्ये नेदरलँड देशाचा कृषी विषयक अभ्यास दौरा करण्याची संधी मिळाली. यामध्ये माझ्यासह तत्कालीन विरोधी पक्षनेते मा.धनंजय मुंडे, मा.आ.अमरसिंह पंडित आदींचा समावेश होता. खरे तर नेदरलँड देशाने कृषी क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल मी फार ऐकून होतो. मात्र प्रत्यक्षात नेदरलँडमध्ये जाऊन तेथील कृषी क्षेत्राचा झालेला विकास पाहता आला आणि तोही आदरणीय शरद पवार साहेबांसोबत! कृषी उत्पादनांची निर्यात करणारा आघाडीचा देश म्हणून आज नेदरलँडकडे पाहिले जाते. फुले, फळे, भाजीपाला, दूध आदींसारखी महत्वाची उत्पादने येथे फार मोठ्या प्रमाणात घेतली जातात. जर्बेरा, गुलाब यासारखी फुले नेरदरलँड देश इतर देशात निर्यात करतो. जैविक पीक संरक्षण आणि नैसर्गिक फलोत्पादनात आंतरराष्ट्रीय बाजारात अग्रगण्य असलेल्या कॉर्पट बायोलॉजिकल संस्थेस आम्ही भेट दिली. या दौर्यादरम्यान भारतीय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व नेदरलँड देशाचे भारतीय राजदूत जे.एस.मुकुल यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या सोबत चर्चा केली. तसेच नेरदरलँडमधील एका शेतकर्याच्या शेतात आम्ही भेट दिली. त्याची जवळपास 500 एकरमध्ये शेती होती. त्यामध्ये एक अत्याधुनिक पद्धतीचा गायींचा गोठा बघितला. जवळपास 565 गायींचा हा गोठा होता. त्यामध्ये स्वयंचलित पध्दतीने दूध काढणे, शेणखताची विल्हेवाट लावतांना त्याचा खत म्हणून वापर तर होतोच त्याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅसचे उत्पादनही तेथे बघायला मिळाले. कृषी क्षेत्राचे व्यवस्थापन कसे करावे हे खरोखरच नेदरलँड देशाकडून आपण शिकण्यासारखे आहे. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा आपल्याकडील शेतकरी बांधवांसोबत चर्चा झाली, तेंव्हा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असणार्या शेतीसंबंधी महत्वाची चर्चा झाली. या चर्चेतील उत्सुकतेमुळे अनेक प्रगतीशील शेतकर्यांनी नवनवीन बाबी जाणून घेतल्या.