विजय मंत्र

कोणत्याही क्षेत्रात जाण्यापूर्वी व्यक्तीने काही बाबींचा विचार करणे फार गरजेचे असते. जसे शारीरिक क्षमता, बौध्दिक क्षमता, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्र्वास इ.व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने शारीरिक क्षमता म्हणजे फक्त श्रम नव्हे तर कोणत्याही व्यवसायात दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहण्याची क्षमता. आरोग्य चांगले असेल तरच हे होऊ शकते. याचाच अर्थ आरोग्य हा व्यक्तिमत्त्वाचा मह्त्त्वाचा भाग आहे. चांगले आरोग्य म्हणजे कोणत्याही प्रसंगी व कोणत्याही वातावरणात न थकता दीर्घकाळ काम करण्याची क्षमता. हे काम शारीरिक किंवा बौध्दिक श्रमाचे असू शकते. एखाद्या फिल्डमध्ये करिअर करण्यासाठी आपण आपल्या लक्ष्याकडे केंद्रित राहून काम करणे खूप गरजेचे असते, तरच ती व्यक्ती यशाच्या मार्गावर राहू शकते.

खाली काही महत्वाच्या बाबी आहेत, ज्या एक यशस्वी करिअर घडवण्यात मदत करतील :

निर्णय क्षमता

व्यक्तीने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यावर सर्व बाजूंनी सखोल विचार केला पाहिजे. व घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहिले पाहिजे. मन छोटयामोठया अडचणीमुळे विचलित होऊ देता कामा नये. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सैन्यातील आधिकारी युध्दात त्याच्या तुकडीस एकदा हल्ल्याचे आदेश दिल्यानंतर कधीही बदल करत नाहीत मग त्यात त्याला कितीही अडचणी येवोत. यातूनच त्याची निर्णयक्षमता दिसून येते व त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच प्रतिमा उमटते.

प्रयत्नशीलता

कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती असून चालणार नाही तर त्यादृष्टीने योग्य प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र हे प्रयत्न स्वत:च्या सुखाचा त्याग करुन करावे लागतात, तरच त्या कार्यात यश मिळण्याची खात्री असते. उदा. जगातील सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्ट हे शेरपा तेनसिंगने इच्छाशक्ती व प्रयत्नांच्या बळावर काबीज केले होते.

इच्छाशक्ती

कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी दृढनि:श्चयाची आवश्यकता असते. व्यक्तीमध्ये जेव्हा प्रबळ इच्छाशक्ती असते, त्यावेळी कोणत्याही अडचणींना धैर्याने तोंड देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. या क्षमतेच्या जोरावर तो अशक्य गोष्टीही शक्य करु शकतो. याचे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे प्रखर देशक्तीने प्रेरित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्रातील दूर अंतर पोहून स्वत:ची सुटका करुन घेतली.

संभाषण कला

बौध्दिक क्षमतेमध्ये संभाषण कलेला अनन्यसाधारण मह्त्त्व आहे. बुद्धीच्या जोरावर व्यक्ती भरपूर ज्ञान कमवू शकते परंतु हे ज्ञान जर प्रकट करण्याची कला त्याच्याजवळ नसेल तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग होत नाही. बुध्दी असूनसुध्दा विचार प्रकट करण्याची कला नसेल तर व्यक्तिमत्त्वाचा विकास चांगला होऊ शकत नाही.

सकारात्मक विचार

हा एक मानसिक क्षमतेतील अतिशय मह्त्त्वाचा भाग आहे. कोणतेही कार्य करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये त्या कार्याच्या यशाबद्दल शंका कुशंका निर्माण होतात. ज्या व्यक्तीच्या मनांमध्ये त्या कार्याच्या यशाबद्दल आशावाद असतो. त्याला सकारात्मक विचार म्हणतात. तसेच ज्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या कार्याच्या यशाबद्दल शंका असते, त्याला नकारात्मक विचार म्हणतात. चांगल्या व्यक्तिमत्त्वाकरिता सकारात्मक विचार असणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार असणार्‍या व्यक्ती आपल्या भावी जीवनात यशस्वी होताना दिसतात.