मे 2020 मध्ये राज्यात बारावीच्या उत्तर पत्रिका जमा करण्याचे काम महाराष्ट्र राज्य माध्य.व उच्च माध्य.शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळाकडून सुरू होते. औरंगाबाद शहर त्यावेळी ‘रेड झोन’मध्ये असल्याने जालना, परभणी, बीड, हिंगोली याठिकाणाहून उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांना व नंतर त्यांच्या कुटुंबासाठी हे धोक्याचे ठरू शकते. त्यातच ‘लॉकडाऊन’ व संचारबंदी असल्याने इतर जिल्ह्यातील शिक्षकांना औरंगाबादला येण्यासाठी वाहन देखील उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यावर औरंगाबाद विभागीय मंडळाने इयत्ता 12 वीच्या उत्तर पत्रिका जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर जमा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मी 21 मे 2020 रोजी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड, महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, औरंगाबाद येथील विभागीय मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांच्याकडे केली. विभागीय मंडळाने यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन जिल्हास्तरावर 12 वीच्या उत्तर पत्रिका जमा करण्याची व्यवस्था करून दिली.