बारामती येथील विद्या प्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. राज्यासह देशभरातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विविध अभ्यासक्रमांसाठी येथे प्रवेश घेतात. तिथे विद्यार्थी कशा पध्दतीने अध्ययन, संशोधन करतात, विद्यार्थ्यांना कोणत्या शैक्षणिक सोयी-सुविधा मिळतात याची माहिती मराठवाड्यातील आपल्या विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी 2014 मध्ये मी शैक्षणिक सहल आयोजित केली होती. मी स्वतः या उपक्रमात सहभागी होतो. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली होती. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे निसर्गरम्य आणि शिक्षणासाठी प्रेरक असे संकुल पाहून विद्यार्थी भारावून गेले. येथील शैक्षणिक वैशिष्ट्ये मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी बारकाईने समजून घेतले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार व सौ.सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत आपुलकीने संवाद साधला, व त्यांच्या जिज्ञासू प्रश्‍नांना उत्तरे दिली. विशेष म्हणजे दादांनी या विद्यार्थ्यांसोबत सपत्नीक स्नेहभोजन घेतले. सर्व विद्यार्थ्यांनी ही सहल अविस्मरणीय असल्याचे मला सांगितले.