भारतीय संगीत हा विषय इयत्ता 11 वी व 12 वी साठी मागील अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात 200 गुणांसाठी अभ्यासला जायचा. शालेय शिक्षण विभागाने सुधारित विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजनेखाली शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून 200 गुणांचा संगीत विषय 100 गुणांवर आणला होता. हा निर्णय संगीत शिकणारे विद्यार्थी व शिक्षकांवर अन्यायकारक ठरणारा होता. त्यामुळे राज्यातील सर्व संगीत शिक्षक अर्धवेळ तसेच अतिरिक्त ठरण्याची शक्यता होती. त्याकरिता भारतीय संगीत या विषयाचे मूल्यांकन पूर्वीप्रमाणे 200 गुणांचे करावे अशी मागणी मी 16 ऑगस्ट 2019 रोजी शालेय शिक्षणमंत्री, शालेय सहसचिव यांच्याकडे केली होती. अखेर 11 नोव्हेंबर 2019 रोजी शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात शुध्दीपत्रक काढून इयत्ता 11 वी व 12 वी संगीत विषय मूल्यांकन पूर्वीप्रमाणेच करण्याचा निर्णय घेतला. सदरील प्रश्न सोडवल्याबद्दल विविध महाविद्यालयांत संगीत विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी 17 नोव्हेंबर 2019 रोजी सदिच्छा भेट घेऊन आभार मानले.