आदरणीय सतीशभाऊ चव्हाण,

आपणांस साष्टांग नमस्कार..

लोकांना देव भेटला की नाही, मला माहीत नाही, परंतु मला देवाचे दर्शन झाले आहे, आणि माझा देव तुम्ही आहात. हो भाऊ, आपणच माझे दैवत आहात!

मी इयत्ता सातवीत शिक्षण घेत असताना माझे वर्गशिक्षक श्री. संजय पांढरे सरांनी मला शिक्षणासाठी दत्तक घेतले. कारण, माझ्या आईवडिलांना ऊसतोड मजूरी करण्यासाठी दरवर्षी सहा महिने मला व माझ्या भावंडांना सोडून बाहेरगावी जावे लागायचे. मी घरात मोठी असल्यामुळे लहान भावंडांचा सांभाळ करून  शिक्षण घेत होते. ही बातमी पांढरे सरांनी आपणापर्यंत पोहचवली व आपण लगेच धोंडराई गावी आमच्या घरी येऊन आपुलकीने विचारपूस करून आम्हाला तातडीने 25 हजार रुपयांची मदत केली. तसेच दरमहा तीन हजार रुपये देण्याचेही ठरवले. व आतापर्यंत न चुकता देत आहात. आदरणीय भाऊ, आपल्या या निर्णयामुळे माझ्या आईवडिलांची ऊसतोडणीपासून मुक्तता झाली. आता आम्ही सर्वजण सोबत राहू शकतो. आपल्या या मदतीमुळे भाऊ, आमच्या कुटुंबाला फार मोठा आधार मिळाला. आमच्याकडे शेती नाही. आईवडील मजूरी करतात. अशा परिस्थितीत केवळ आपल्या मदतीमुळेच मी शिक्षण घेऊन 10 वीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होऊ शकले. आपण माझ्या उच्चशिक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे मी आता चांगल्या आयुष्याची स्वप्ने बघू शकत आहे. तुमच्या आशीर्वादाने मी आता खूप प्रयत्न करून माझ्या कुटुंबाची परिस्थिती बदलून दाखवणार आहे. तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. खरंच भाऊ, आपले आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत.

पल्लवी सखाराम कदम

धोंडराई, ता. गेवराई, जि. बीड