पैठण तालुक्यातील दुष्काळी गावांना जायकवाडी धरणातून सिंचन व पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन भाग-2 योजना 2009 साली हाती घेण्यात आली होती. मात्र 2014 नंतर ही योजना निधी अभावी रखडली. योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने मी यासंदर्भात 25 जून 2019 रोजी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित करून सदरील प्रश्नाला वाचा फोडली. लक्षवेधीव्दारे विचारलेल्या प्रश्नांना तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्र्यांनी सभागृहात समाधानकारक उत्तरे दिले नाही, म्हणून मी सभात्याग केला. त्यानंतरही ही योजना पूर्ण व्हावी म्हणून मी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करीत राहिलो. आज या योजनेचा प्रथम टप्पा पूर्ण झाला असून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले आहे.